Thursday 7 September 2023

श्री कृष्णा रे ... Poem by Dr Priyaveera Karnik on Krishna Janmashtami

श्रीकृष्णा रे

श्रीकृष्णा रे जरी तू वससी, गोपांच्या नगरात

प्रकटलास रे रांगत रांगत, माझ्या आयुष्यात॥


मुकुटामधले मोरपीस ते, खास तुला शोभले

खट्याळ तव हे नयन पाहुनी, मोहित रे मी झाले॥


तव हास्याची जेव्हा झाली, माझ्यावर बरसात

वात्सल्याचा पान्हा फुटला, रे माझ्या ह्रदयात॥


बाललीला त्या न्याहाळताना, माझे भान हरपले

यशोदेस का वेड लागले, आज मला उमगले॥


मुरलीधरा रे कृष्णकन्हैय्या, आज तुला प्रार्थिते

वात्सल्याचे अन् भक्तीचे,दानच मी मागते॥


- डाॅ. प्रिया कर्णिक.

परमात्मा अवतरला॥


 जेव्हा आली ग्लानी धर्मा, चमत्कार जाहला

साधूंच्या रक्षणास जगती, परमात्मा अवतरला॥


श्रीकृष्णा रे नंदनंदना, जगद्गुरू तू अससी

कुरूक्षेत्र झाले मम जीवन, मार्ग तुच दाखविसी॥


सत्यअसत्याच्या या कोंडीत, मन माझे बावरते

आयुष्याच्या रणभूमीवर, मीच संभ्रमित होते॥


सारथी होऊनी मम बुध्दीचा, संरक्षण दे मजला

पार्थाच्या जिवलगा केशवा , शरण मी आले तुजला॥


- डाॅ. प्रिया कर्णिक.

No comments:

Post a Comment