Tuesday 26 September 2023

Yogi | Poem by Dr Priyaveera Karnik

 योगी.... 


कोण म्हणतं तपश्चर्येसाठी

हिमालयात जाव लागतं

कोण म्हणतं साधनेसाठी

अरण्यात जाव लागतं॥ 


घरादारावर तुळशीपत्र ठेवून

सन्यासी व्हावं लागतं

असे वाटणार्या प्रत्येकाला

मनापासून सांगावसं वाटतं॥ 


विरक्त साधक होणे हे

नक्कीच खूप कठीण असते

पण संसार करताना परमार्थ

हे तर अग्निदिव्यच असते॥ 


सारे काही उपभोगतानाही

अडकायचे मात्र कशातच नसते

असा आगळा विरोधाभास

हीच तर त्यातील गोम असते॥ 


सुखदुःखाचा पाठशिवणीचा खेळ

अन् नित्य नवी आव्हाने

जणू तारेवरची कसरतच होते

जपत असता सर्वांची मने॥ 


प्रत्येक नात्याला न्याय देताना

झोकून  देणे अपेक्षित असते

निरपेक्ष प्रेम करीत रहाणे

कोणत्याही साधनेपेक्षा सोपे नसते॥ 


कधी बाह्यजगाशी तर कधी स्वतःशी

संघर्ष तर अटळ असतो

प्रतिकूल परिस्थितीशी झगडताना

माणसातील संयमाचा कस लागतो॥ 


जो करू शकतो आत्मसात

निष्काम कर्मयोग त्या योगेश्वराचा

तोच म्हणू शकतो मी सर्वांचा

अन् तरीही मी नाही कुणाचा॥ 


असा हा खडतर जीवनप्रवास

सामान्याला असामान्य बनवतो

विवेकपूर्ण वैराग्याच्या मृगाजिनावर

बसणारा चिरंतन योगी ठरतो॥ 


डाॅ. प्रिया कर्णिक.

Thursday 7 September 2023

श्री कृष्णा रे ... Poem by Dr Priyaveera Karnik on Krishna Janmashtami

श्रीकृष्णा रे

श्रीकृष्णा रे जरी तू वससी, गोपांच्या नगरात

प्रकटलास रे रांगत रांगत, माझ्या आयुष्यात॥


मुकुटामधले मोरपीस ते, खास तुला शोभले

खट्याळ तव हे नयन पाहुनी, मोहित रे मी झाले॥


तव हास्याची जेव्हा झाली, माझ्यावर बरसात

वात्सल्याचा पान्हा फुटला, रे माझ्या ह्रदयात॥


बाललीला त्या न्याहाळताना, माझे भान हरपले

यशोदेस का वेड लागले, आज मला उमगले॥


मुरलीधरा रे कृष्णकन्हैय्या, आज तुला प्रार्थिते

वात्सल्याचे अन् भक्तीचे,दानच मी मागते॥


- डाॅ. प्रिया कर्णिक.

परमात्मा अवतरला॥


 जेव्हा आली ग्लानी धर्मा, चमत्कार जाहला

साधूंच्या रक्षणास जगती, परमात्मा अवतरला॥


श्रीकृष्णा रे नंदनंदना, जगद्गुरू तू अससी

कुरूक्षेत्र झाले मम जीवन, मार्ग तुच दाखविसी॥


सत्यअसत्याच्या या कोंडीत, मन माझे बावरते

आयुष्याच्या रणभूमीवर, मीच संभ्रमित होते॥


सारथी होऊनी मम बुध्दीचा, संरक्षण दे मजला

पार्थाच्या जिवलगा केशवा , शरण मी आले तुजला॥


- डाॅ. प्रिया कर्णिक.