Monday 21 August 2023

मना रे.... (Poem by Dr Pryaveera Karnik)

 मना रे....


मना रे कधीपासून एक

गोष्ट तुला विचारीन म्हणते,

तुझ्या तगमगीचे खरे कारण

शोधण्याचा मी प्रयत्न करते॥


विचारांच्या चक्रव्यूहात

कायमच तू अडकत जातोस,

अन् निराशेच्या दलदलीमध्ये

खोलवर रूतत जातोस॥


सुखाआड येणारे स्वार्थी जग

म्हणत सतत कुढत राहतोस,

पण लक्षात ठेव तुझा खरा

शत्रू तर तू स्वतःच असतोस॥


चंचलता अन् बेबंदपणाचा

नेहेमीच रे  तू गुलाम असतोस,

क्षणिक मोहाच्या खोट्या सुखाला

कायमच तू बळी पडतोस॥


मग स्थिर, संयमी बुध्दी तुला

यत्किंचितही आवडत नाही,

तिने घातलेला लगाम तुला

जरादेखील रूचत नाही॥


अनादी काळापासूनच्या या द्वंद्वाला

आतातरी पूर्णविराम दे,

सद्सद्विवेकबुध्दीस स्मरून तुझ्या

अंतरात्म्याचा कौल घे॥


ज्या दिवशी हे अग्नीदिव्य

पार पाडून पुढे जाशील,

त्याच दिवशी खराखुरा

गुलामगिरीतून मुक्त होशील॥


मग खुशाल घडव जीवनाचे शिल्प

पण पुन्हा अहं मध्ये अडकू नकोस,

तुझ्या विवेकबुध्दीत वसणारा"तो" च

खरा शिल्पकार हे विसरू नकेस॥


तिन्हीसांजेला "त्याला" स्मरून

देव्हार्यात जेव्हा सांजवात तेवेल,

तुझ्यातील  अंर्तमनाचा गाभाराही

त्याच ज्योतीने उजळून निघेल॥


एक निरामय सुखद शांतता

तुझ्यात हळूहळू झिरपू लागेल,

तुझ्यातच वसलेली पवित्र प्रार्थना

शब्दस्वरूपात आकारू लागेल॥


"शत्रुबुध्दी विनाशाय

दीपज्योति नमोऽस्तुते

दीपज्योती नमोऽस्तुते"॥


-डाॅ. प्रिया कर्णिक.

No comments:

Post a Comment