Friday 11 August 2023

"आणि दलदल बोलू लागली " Poem by Dr Priyaveera Karnik

 एखादी जागा " नंदनवन" वाटत असतानाच त्या जागेची दुसरी भयाण, बिभत्स बाजू अचानकपणे दिसू लागते..  तेथील उन्मत्त दलदलीला वाचा फुटते... 'आणि दलदल बोलू लागली.'... 


एके दिवशी एक दिवाणा

जग जिंकाया घरुन निघाला।

फिरता फिरता त्या वेड्याला

अतिमोहक जलाशय दिसला ।। 


स्वच्छ नि सुंदर निळ्याशार त्या

पाण्याच्या प्रेमातच पडला ।

त्याच क्षणाला उडी मारूनी

त्यामाजी तो विहरु लागला ।। 


उत्साहाच्या भरात वेडा

खोलखोल तो जात राहिला ।

पाहता पाहता त्याच्या नकळत

पार तळाशी तो पोचला ।। 


अन् अचानक जाणवले त्याला

तो माझ्या राज्यात पोचला ।

राणी मीच तेथली होते

"दलदल" माझे नावच होते ।। 


घट्ट पकडुनी पाय तयाचे

माझ्या मध्ये रुतवत होते ।

गुदमरूनी संपविले त्याला

ते तर माझे कामच होते ।। 


कुठे उडी तो मारीत होता

माहीत नव्हते त्या वेड्याला ।

काळ मी त्याचा सज्जच होते

दलदल बनुनी गिळण्या त्याला ।। 


दलदल माझे नाव असे मी

कलीच्या पोटी जन्मा आले ।

लिंग, जिव्हा माझी हत्यारे

सैतानाला पिता मानले ।। 


काम,क्रोध अन् क्रौर्य जयांनी

अंगी सहजी धारण केले ।

गुलाम बनुनी सैतानाचे

माझ्याशी एकरूप झाले ।। 


दुसऱ्यां वरती चिखल उडविणे

चिखलामाजी स्वतः लोळणे।

यातच रमण्या मी शिकविते

माणसास मी पशू बनविते ।। 


साध्या भोळ्या जनसामान्याला

मोहिनी माझी भूल घालते

चक्रव्युह खोट्याचे रचूनी

सत्यापासूनी लांब ठेवते।। 


समाजपुरुषाची मन,बुध्दी

दोन्हीवरती माझी सत्ता ।

वापरूनी माझी शस्त्रे मी

भिनवित असते नकारात्मता ।। 


घाबरते परी मी एकाला

रणकर्कश त्या श्रीरामाला ।

ममपाशातून सोडविण्याच्या

अफाट त्याच्या सामर्थ्याला ।। 


मू्र्खा तुज हे उमगत नाही

साद तयाला घालत नाही ।

तोवरी मी " दलदल" चि राणी

मीच लिहिन रे तुझी कहाणी ।। 


- डॉ. प्रिया कर्णिक.

No comments:

Post a Comment