Friday, 6 November 2020

Aatmabal - Nandai's gift -Women Empowerment (Bakulveera Merchant)

 हरिओम!

आत्मबल वर्ग म्हणजे श्रद्धावान वीरांना  नंदाईच्या गोड शाळेत तिच्याकडून घडवून घेण्याची सुवर्णसंधी!

स्त्रीमुक्ती म्हणजे साऱ्या चौकटी झुगारून देणारं बंड नाही तर आपल्यातील स्वत्वाची ,स्वस्वरूपाची आणि सुप्त कलागुणांची जाणीव झाल्यावर स्त्रीच्या जीवनात आणि पर्यायाने तिच्या कुटुंबात आणि समाजात घडून आलेले आश्चर्यकारी बदल याची स्पष्टता आणि हा आत्मविश्वासपूर्ण,आत्मसन्मानपूर्ण तरीही नात्यांची जाण ठेवणारा आत्मबदल घडवण्यासाठीच नंदाईच्या खासमखास शैलीत साकारलेला  आत्मबल वर्ग।

एका बदकाचे हंसात झालेले रूपांतर!

हा हंस नेहमीच उठून दिसतो आपल्या डौलदार व्यक्तित्वाने,आपल्या चांगलं काय आणि वाईट काय या निरक्षीर विवेक न्यायाच्या गुण वैशिष्ठयाने आणि सर्वात महत्वाचं म्हणजे साक्षात ललिता मातेचं वाहन बनण्याच्या मिळालेल्या सुसंधीने.

जेंव्हा नंदाई आपली आत्मबलाची लेक म्हणून निवड करते तेंव्हाच सुरुवात होते बदक ते राजहंस या बदलाच्या तिच्या किमयेला.एका तळ्यात राहणाऱ्या स्त्री जीवाला ती मानसरोवराच्या दिशेची ओढ लावते, हा प्रवास घडवून घेते आणि तिला राजहंस,आपलं वाहन बनवते,या राजहंसाच्या आत्मरूपी पंखांना आपली माया पुरवत,आपली ताकद देत!

आत्मबल वर्ग म्हणजेच तिने राजहंसाला दिलेला पावित्र्याचा,शांतीचा आणि आत्मिक समाधानाचा श्वेत रंग!

 आत्मबल वर्ग म्हणजे मुक्त आकाशात भरारी घेण्याची प्रेरणा,त्यासाठी प्रयासांची पराकाष्ठा करण्याची निर्माण केलेली जिद्द आणि प्रत्येक यशाचं श्रेय मोठ्या आईचंच कारण तीच कर्ती, धर्ती, पालनकर्ती या अंबद्न्य विश्वासाचं श्रद्धाबल।

     ' सबकुछ तेरा ' हा भक्तीचा पाया स्थिर करत नंदाईच्या समर्थ लेकी म्हणून मिरवण्याचं  भाग्य सद्गुरु बापू,आई आणि सुचितदादा यांच्या प्रत्यक्ष सहवासात पुन्हा एकदा मिळावं म्हणून झालेल्या सर्व तेरा बॅचेसच्या वीरांना लाभलेलं नंदाईचं कृपाबल म्हणजेच 5 आणि 6 नोव्हेंबर 2011 या दोन दिवसांत साजरा झालेला 

'आत्मबल महोत्सव'!

'माझ्या आत्मबल च्या लेकीचे कौतुक करण्यासाठी हा उत्सव आहे'

असं सांगत स्वतः बरोबरच बापू आणि दादा यांच्याकडूनही कौतुकाची भरभरून दाद मिळवून देत प्रत्येक वीरा अधिक आत्मबलसंपन्न व्हावी,आपल्या आनंदाचा आविष्कार सर्व प्रेक्षक श्रद्धावानांसमोर सादर करताना त्यांच्याही मनात 'अनिरुध्द भक्ती' चा चैतन्यदायी आनंद झंकार कायम उमटत राहावा हीच इच्छा या आनंदिनी नंदाईची।

म्हणूनच या सोहोळयाची टॅग लाईन

'आनंदाचा उत्सव!

उत्सवाचा आनंद!'

आणि खरच हा सोहोळा म्हणजे आनंदाचा जल्लोष होता,

उत्सवाचा उल्हास होता,

सहभागी असणाऱ्या प्रत्येकासाठी उचिततेचा, उन्नयनाचा आणि उद्धार गतीचा सुंदर प्रवास होता.

आज नऊ वर्षे झाली या तेराशे सख्यांच्या सहभागातून साकारलेल्या अभूतपूर्व आनंदोत्सवाला पण साऱ्या आठवणी आजही ताज्या आहेत,डोळ्यांसमोर येते ती आईची अथक मेहेनत.आईचं अभ्यासपूर्ण प्लॅंनिंग,कार्यक्रमांची आणि त्यात भाग घेणाऱ्यांची निवड,तालमींच्या वेळी कोणतीही गैरसोय होवू नये याचा बारकाईने केलेला विचार,कार्यक्रमाची नियोजनबद्ध आखणी,संबंधित प्रत्येक कामासाठी घेतलेल्या मिटींग्ज,आवश्यक सूचना,नृत्य असो नाट्य असो ,

ध्वनिफीत असो की जोक्स एन्याक्टमेंट असो साऱ्यांच्या तालमीना बारकाईने लक्षपूर्वक हजेरी लावणं,भूमिका कशी तंतोतंत साकारायची याचं स्वतः दिग्दर्शन करणं, हे सारं करत असताना सर्व बाबींच भान राखणं तेही घरच्या साऱ्या जबाबदाऱ्या सांभाळत!

अबब, आईचा हा सर्वसमावेशक संचार म्हणजे अनिरुध्द गतीचा विस्मयकारक अनुभव होता आणि स्वतः सारी मेहेनत करत असताना साऱ्या लेकींना आईच या कार्यक्रमाच्या तयारीच बळ पुरवत होती.

आणि जे घडत होतं,जी अनुभूति मिळत होती ती विलक्षण होती,अद्भूत होती म्हणूनच ती अविस्मरणीय आहे.1300 सख्या एका मंचावर हे once in a era हे खरंच,पण याच्या तालमींदरम्यान असणारं प्रफुल्लित,उत्साहित,आनंदित वातावरण खरंच अनोखं।

चार बायका जमल्या की उखाळ्या पाखाळ्या ,हेवेदावे हे सारे गैरसमज इथे नावालाही नव्हते.होती फक्त एकमेकांबद्दलची आपुलकी,जिव्हाळा आणि कळकळ. म्हणूनच कधी घरी बनवून आणलेल्या पदार्थांची लयलूट तर कधी सख्यांसोबत शेअर केलेल्या मनमोकळ्या गप्पा आणि या साऱ्यांना असलेलं जबाबदारीचं भान.या भारावलेल्या काळात इतक्या गमतीजमती  केल्या ,इतके हसरे क्षण अनुभवले,आईने झोळी आनंदाने भरून टाकली,

आठ महिने कसे भुर्रर्रकन निघून गेले ते कळलं नाहीच उलट या सहवासाची ओढ लागून राहिली आणि तीच नंतरही टिकली.

हेच तर आईला हवं होतं,म्हणून तर हा आनंदाचा उत्सव!

   ही आईच क्षमतेचा विस्तार करणारी,या क्षमता उचितासाठीच वापरण्याचा विवेक देणारी.

   हीच आनंदिनी आणि हीच संधिनी!

सख्यांना एकमेकींशी जोडणारी,

विचारांना सदाचाराशी जुळवणारी,

पारंपारिक जुने आणि उपयुक्त नवे यांची सांगड घालायला शिकवणारी,

निर्भय आणि निखळ प्रेम यांची संगत घडवणारी,

दिलेले आत्मनिर्भरतेचे धडे न घाबरता,न लाजता इतर श्रद्धावानांसमोर गिरवताना त्यांचीही मने कार्यक्रमाच्या विषयांशी जुळवणारी,

    आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सख्या आणि श्रद्धावान प्रेक्षक यांची मने बापूभक्तीशी,बापुकार्याशी आणि निरंतर प्रेम करणाऱ्या मोठ्या आईच्या निरंतर  अंबज्ञतेशी जोडणारी ही संधिनी !

   सुहास्य वदनाने आपलं हे कार्य सहजतेने करणारी आई म्हणूनच तिची मायेची,वात्सल्याची आणि संस्कारांची नाळ कधीच सुकू देत नाही,कधीच तुटू देत नाही.

  या कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिवशी कार्यक्रम सुंदर रीतीने पार पडल्याबद्दल सर्व सख्यांकडून 'श्रीराम' म्हणून घेतल्यावर  आईने एक वाक्य सर्व सख्यांकडून तीनदा मोठ्याने वदवून घेतलं. ते वाक्य म्हणजे-

"उतणार नाही,मातणार नाही,घेतला वसा टाकणार नाही".

हे न उतण,न मातण म्हणजेच मी पणाचा अहंकार त्यागण.मोठी आई सारं करून घेते या तिच्या प्रेमाची अंबद्न्यता स्वीकारणं.

आणि घेतला वसा टाकणार नाही म्हणजे आईकडून मिळालेल अमोल आनंदबल हे  आनंदपान आणि आनंददान यासाठी कायम वर्धिष्णू ठेवू,या कार्याची ध्वजा तळपत ठेवू.

   हे कार्य आपल्या लेकींकडून करवून घेणं हीच आईची तळमळ,

बापूकृपेपासून कोणीच वंचित राहू नये हीच आईची कळकळ,

म्हणूनच ज्या सख्यांना खरंच तालमीना हजर राहणं शक्य नव्हतं त्यांच्यासाठी या महोत्सवात साजरं केलं गेलं साऱ्या सख्यांसोबत प्रेक्षणीय कार्निव्हल।

    अशा या न भूतो न भविष्यती आनंदोत्सवात भाग घेता आला हे नाथसंविधच.सख्यांच्या संगतीत,आईच्या खास देखरेखीखाली अनुभवलेले ते क्षण कायम आनंदाची उधळण करत राहिलेत कारण हा संकल्प स्वतः चिदानंदा नंदाईचा!

  अंबद्न्य साऱ्या सख्यांना,

  अंबद्न्य साऱ्या टीचर्सना,

  अंबद्न्य या महोत्सवात मदत         करणाऱ्या साऱ्या श्रद्धावान मित्रांना,

   अंबद्न्य माझ्या नंदाईला,

   अंबद्न्य माझ्या मोठ्या आईला,

   आणि अंबद्न्य माझ्या बापूना ज्यांनी आपल्या लेकींवर नेहमीच विशेष प्रेम केलं,त्यांची काळजी घ्यायला वात्सल्याची शुद्ध मूर्ती असणाऱ्या नंदाईला कार्यरत केलं!

   नऊ वर्षपूर्तीच्या या दिवशी आनंदस्वरूपी आईबाबांच्या स्मरणात हाच गजर मुखी येतोय -

  'आनंदे गुरुमाय, 

   निजानंदे गुरुमाय,

   सच्चिदानंदे गुरुमाय,

   पूर्णानंदे गुरुमाय,

   आनंदे,निजानंदे, सच्चीदानंदे गुरुमाय।।

   श्रीनंदे गुरुमाय,

    चिदानंदे गुरुमाय,

    पूर्णानंदे गुरुमाय,

    नंदे नंदे गुरुमाय।।'

    श्रीनंदे,चिदानंदे, नंदे नंदे गुरुमाय।।'

    अंबद्न्य नाथसंविध।

I LOVE YOU AAI and YOU ARE THE BESTEST AAI।

       बकुळवीरा मर्चंट.

1 comment: